फुगण्यातील आनंद....

जीवनातील दाब: विज्ञानापासून मनाच्या शांतीपर्यंतचा प्रवास

​आज गॅसवरील तव्यावर सुगंध दरवळत   भाकरी छान फुगलेली बघून मनात एक स्वाभाविक आनंद झाला. तशीच चपाती फुगलेली बघूनही आपल्याला तृप्ती मिळते. हे फुगणे अन्नाच्या परिपूर्णतेचे लक्षण आहे. 'फुगणे' या प्रक्रियेशी आपले नाते बालपणापासून असते. रंगीबेरंगी फुगा फुगवताना मिळणाऱ्या आनंदाने आपले बालपण रमणीय बनते. आजही समुद्रकिनाऱ्यावर हवेत तरंगणाऱ्या फुग्यांना (बलून्सना) टांगून बसणे आणि त्यांना बघणे हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा आवडता खेळ झाला आहे. मात्र, 'फुगणे' या शब्दाचे अर्थ परिस्थितीनुसार बदलत जातात. लहानपणी मनासारखे काही घडले नाही की मुलं गाल फुगवून बसतात, ज्याला आपण रुसणे म्हणतो. पण हेच फुगणे जेव्हा अहंकाराचे रूप घेते, तेव्हा ते विनाशाचे कारण ठरते. फुग्यात हवा भरली की अति दाबाने तो जसा फुटतो, तसेच गर्वाने फुगल्यामुळेही त्या व्यक्तीचा अध:पात होतो. म्हणूनच माणसाचे पाय नेहमी जमिनीवर असावेत असे म्हणतात ते उगीच नाही.

​विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर हा 'दाब' (Pressure) अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण पृथ्वीवर वावरताना आपल्या शरीरावर दर चौरस इंचाला सुमारे १४.७ पाउंड इतका वातावरणाचा दाब सतत पडत असतो. आपल्याला तो जाणवत नाही कारण आपल्या शरीराचा अंतर्गत दाब त्याला संतुलित करत असतो. हे संतुलन बिघडले तर जगणे कठीण होईल. कारखान्यातही कंटेनरमध्ये हवेचा दाब देऊन त्याची 'प्रेशर टेस्ट' करतात, कारण रासायनिक प्रक्रिया किंवा हवेचा दाब मर्यादेबाहेर गेला तर स्फोटाची शक्यता असते. याच हवेच्या दाबाचा उपयोग कॉम्प्रेसरमध्ये करून एअर कंडिशनिंग, रेफ्रिजरेशन आणि बॉयलरमध्ये वाफेच्या स्वरूपात केला जातो, ज्यामुळे आपले जीवन सुखकारक होते. घराघरातील प्रेशर कुकरही याच तत्त्वावर चालतो; वाफेचा योग्य दाब अन्न शिजवतो, तर जास्तीचा दाब 'शिट्टी'द्वारे बाहेर सोडून संतुलन राखले जाते.

​हाच विज्ञानाचा नियम आपल्या मानवी शरीराला आणि मनालाही लागू होतो. शरीरातील रक्तदाब (Blood Pressure) वाढणे जसे आरोग्यास हानिकारक असते, तसेच मनावर विचारांचा दाब वाढणेही धोक्याचे असते. मनावरील ताण आणि भविष्याची चिंता हा एक प्रकारचा मानसिक दाबच आहे. विशेषतः आयसीयू (ICU) सारख्या कठीण आणि अनिश्चित काळात, जेव्हा बाहेरचा परिस्थितीचा दाब वाढतो, तेव्हा "I am OK" सारख्या सकारात्मक मंत्रांचा जप करणे हे एखाद्या 'सेफ्टी व्हॉल्व्ह'सारखे काम करते. हा मंत्र मनाला नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे नेतो आणि अंतर्गत दाब संतुलित ठेवतो.

​हा मानसिक दाब नियंत्रित करण्यासाठी निसर्गाने आपल्याला दीर्घ श्वास घेणे, दहा आकडे उलट मोजणे किंवा शांत अवस्थेत बसणे यांसारखी सोपी साधने दिली आहेत. हे मार्ग म्हणजे मानवी मनाची 'शिट्टी'च आहेत, जी अतिरिक्त ताण बाहेर काढून आपल्याला स्थिर ठेवतात. शेवटी, विज्ञानात असो वा आयुष्यात, 'फुगणे' किंवा 'दाब' हा नेहमी प्रमाणातच असावा. जेव्हा हा दाब संतुलित आणि नियंत्रित असतो, तेव्हाच जीवन खऱ्या अर्थाने सुखकारक आणि प्रगत होते.

राघवेंद्र मण्णूर डोंबिवली 

९६१९३५४७०४

Comments

Popular posts from this blog

जीवनातील दाब: